BACK

अवैज्ञानिक आणि अतार्कीकही!

0 comments

Summary

एखादी गोष्ट घडताना कोणीच पहिली नाही हे कारण ती गोष्ट घडलीच नाही असा निष्कर्ष काढण्यास पुरेशी नाही

Full Article

माननीय डॉ. सत्यपाल सिंग, मनुष्यबळ विकास राज्यमंत्री, भारत सरकार, यांनी नुकत्याच केलेल्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताला फेटाळणाऱ्या वक्तव्याला बऱ्याच वृत्त माध्यमांनी प्रसिद्धी दिली (येथे, येथे, येथे, येथे). यावेळी डॉ. सत्यपाल सिंग औरंगाबाद येथे अखिल भारतीय वैदिक संमेलनाच्या निमित्ताने पत्रकारांना उद्देशून बोलत होते. मंत्री कार्यालयाने (@OfficeOfSPS) या घटनेनंतर केलेल्या ट्विट मध्ये या वक्तव्याचा व्हिडिओ देखील प्रसिद्ध करण्यात आला. हिंदीमधून बोलताना डॉ. सिंग म्हणाले की एखाद्या जंगलात किंवा गावात माकडाचा माणूस होताना पाहिल्याचा उल्लेख गेल्या शेकडो वर्षांत आपल्या पूर्वजांनी केलेला नाही. ज्याअर्थी कोणाच्याही पाहण्यात अशी गोष्ट आलेली नाही, त्याअर्थी डार्विनचा उत्क्रांतीवादाचा सिद्धांत हा शास्त्रीयदृष्ट्या चुकीचा आहे आणि माणूस अर्थातच माणूस म्हणूनच भूतलावर आला आणि कायम तसाच राहील. ते पुढे म्हणाले की आपल्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणात ही गोष्ट परावर्तित होणे गरजेचे आहे. ते असही म्हणाले की बऱ्याच श्रोत्यांना कल्पना नसेल पण काही परदेशी वैज्ञानिकांनी, सुमारे ३५ वर्षांपूर्वीच हे दाखविले आहे की उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतात काहीही तथ्य नाही.

डॉ. सिंग यांचे हे विधान विविध पातळ्यांवर अवैध आहे आणि केवळ जीवशास्त्रच नाही तर तर्कशास्त्राच्याही पकडीबाहेरच आहे असंम्हणायला हरकत नाही! प्रथमतः हे लक्षात घेणे गरजेचे आहे की उत्क्रांतीवादाच्या मूलभूत संकल्पना, त्याची प्रक्रिया आणि त्याचबरोबर माणूस आणि आता नामशेष झालेल्या इतर मानवीय प्रजाती ह्यांच्यामधील बदल, ह्या संकल्पना जगभरातील वैज्ञानिक मान्य करतात. ह्या प्रक्रियांमधील बारीक तपशीलावर शास्त्रज्ञांच्यात मतभेद आहेत, जसे ते कुठल्याही शास्त्रात असतात. पण ह्याचा अर्थ असा मुळीच नाही की डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या मूलभूत सिद्धांतावरच एकमत नाहीये. आत्तापर्यंत गोळा केलेला एकही शास्त्रीय पुरावा ह्या प्रक्रियेच्या विरोधात नाहीये. उत्क्रांतीवादात सांगितलेले बदल भारतातील वैज्ञानिकांसकट जगभरातील लोकांनी, प्रयोगशाळांमधील प्रयोगांतून वारंवार घडताना पहिले आहेत. ह्या बदलांच्यात नवीन प्रजाती निर्माण होताना घडणाऱ्या काही प्रारंभिक बदलांचाही समावेश आहे. ३५ वर्षांपूर्वी असा कुठला पुरावा समोर आला जेणेकरून उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मोडीत निघाला, ह्याबद्दल मी पूर्ण अंधारात आहे. पण माझ्या अंदाजानुसार डॉ. सिंग ज्या पुराव्याचा उल्लेख करतायत तो बहुदा १९७० च्या दशकातील ‘Punctuated Equilibrium‘ ह्या नावाने प्रसिद्ध झालेला विवाद असावा. ह्या वादाचा प्रमुख मुद्दा हा उत्क्रांतीत होणारे बदल हे लहान पण नियमितपणे होणारे असतात का मोठे आणि बऱ्याच काळानंतर अचानक होणारे असतात, हा होता. जर माझा कयास बरोबर असेल तर डॉ. सिंग ह्या विवादाचा अर्थ अजिबात समजू शकलेले नाहीत. पण त्याहूनही महत्वाचे हे की एखादी गोष्ट घडताना कोणीच पहिली नाही हे कारण ती गोष्ट घडलीच नाही असा निष्कर्ष काढण्यास पुरेशी नाही. ह्याउप्पर डॉ. सिंग ह्यांच्या अपेक्षेनुसार आपले पूर्वज हे माकडाचा माणूस होतानाच्या घटनेचे साक्षीदार कसे ठरणार होते हे आकलनाबाहेरचे आहे कारण हे पूर्वज स्वतः उत्क्रांतीने आधीच लिहू-वाचू शकणारे मानव बनलेले होते! मुळातच डार्विनच्या उत्क्रांतीवादाचे चित्रण हे माकडाचा माणूस होताना करणे हे साफ चुकीचे आहे. उत्क्रांतीवाद असं सांगतो की माणूस, माकड आणि इतर वानर प्रजाती ह्या एकाच पूर्वजापासून विकसित झाल्या आहेत. ह्या विधानासाठी आपल्याकडे सबळ पुरावे आहेत. ह्या पुराव्यान्मधे DNA sequence (जनुकांची क्रमवार रचना ) वापरून बनवलेली Phylogenetic trees (विविध प्रजातींमधल्या वंशवेली) आणि population genetics (संख्या अनुवंशिकताशास्त्र) ह्या दोन्ही शाखांतील माहितीचा समावेश आहे. किंबहुना ह्या नवीनतम शाखांमधून मिळणाऱ्या माहितीचे महत्व ओळखून आपले सरकार ह्या शाखांच्या विकासाला चालना मिळण्यावर भर देत आहे.

डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताच्या चौकटीत भारतीय शास्त्रज्ञांनी केलेले योगदान जर आपण ध्यानात घेतले तर डॉ. सिंग ह्यांचे हे वक्तव्य अधिकच दुर्दैवी वाटते. भारतीय वैज्ञानिकांनी उत्क्रांतीवादाच्या अनेक महत्वाच्या शाखांमध्ये महत्वाचे शोध लावले आहेत, यामध्ये कीटक व वनस्पतींमधील परस्परउत्क्रांती, संकरीकरण आणि वर्णनिर्मिती, उपखंडातील विविध प्राण्यांच्या उत्क्रांतीचा इतिहास अश्या अनेक विषयांचा समावेश आहे. मागच्याच वर्षी भारत सरकारच्या विज्ञान आणि प्रौद्योगिकी विभागाने भारतीय शास्त्रज्ञांनी उत्क्रांतीवादाच्या अभ्यासात केलेल्या मूलभूत योगदानाबद्दल त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख सुद्धा केलाय.

योगायोग असा कि इंडियन अकॅडेमी ऑफ सायन्सेस आणि इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमी ह्या दोन्ही संस्था २००६ साली प्रसिद्ध झालेल्या ‘ Statement on the teaching of Evolution’ (उत्क्रांतीवाद शिकवण्याविषयकचे विधान) च्या स्वाक्षरीकर्ता आहेत. जगभरातल्या ६७ वैज्ञानिक अकादमींच्या मंडळांनी एकत्र येऊन तयार केलेल्या ह्या विधानाच्या सुरवातीला चिंता व्यक्त केली गेली आहे : “स्वाक्षरीकर्ता अकादमींच्या असे लक्षात आले आहे की जगभरात वेगवेगळ्या भागात विज्ञान प्रशिक्षणात सजीवसृष्टीचा उगम आणि उत्क्रांती ह्याविषयीचे शास्त्रीय पुरावे, माहिती आणि सिद्धांत लपवून ठेवले जात आहेत, नाकारले जात आहेत किंवा इतर अशास्त्रीय सिद्धांतांशी त्यांची गल्लत केली जात आहे. शैक्षणिक धोरण ठरवणाऱ्या जबाबदार व्यक्ती, शिक्षक आणि पालक ह्यांना आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी मुलांना वैज्ञानिक पद्धती आणि शोध ह्यांचे शिक्षण द्यावे जेणेकरून निसर्गातील वैज्ञानिक गोष्टींचा त्यांचा समज वाढेल. आपल्या निसर्गाविषयीचे ज्ञान आपल्याला आपल्या गरज भागवायला आणि आपल्या पृथ्वीचे संरक्षण करायला अधिक सक्षम बनवते. आम्ही सर्व सहमत आहोत की खाली नमूद केलेले मुद्दे हे सजीवांचा उगम व उत्क्रांतीविषयीचे पुराव्यावर आधारित सत्य असून, विविध विज्ञान शाखांतर्भूत केल्या गेलेल्या असंख्य निरीक्षण आणि प्रयोगांद्वारे सिद्ध केलेले आहेत. उत्क्रांतीत अंतर्भूत असलेल्या प्रक्रियांच्या तपशिलाबाबत जरी काही प्रश्न अनुत्तरित असले, तरी कोणताही शास्त्रीय पुरावा खालील बाबींना विरोध करत नाही:
१. ११ ते १५ अब्ज वर्ष जुन्या ह्या विश्वात, आपल्या पृथ्वीची निर्मिती सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वी झाली
२. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून ते ह्या क्षणापर्यंत तिचा भूभाग आणि वातावरण हे सतत बदलत राहिले आहे आणि ह्याला असंख्य रासायनिक आणि भौतिक प्रक्रिया जबाबदार आहेत
३. पृथ्वीवर सजीवांची निर्मिती सुमारे २.५ अब्ज वर्षांपूर्वी झाली. ह्या सजीवांपासून लवकरच, सुमारे ०.५ अब्ज वर्षात, उत्क्रांतीद्वारे प्रकाश संश्लेषण करू शकणारे सजीव अस्तित्वात आले. प्रकाश संश्लेषणाच्या ह्या प्रक्रियेने हळूहळू वातावरणातील प्राणवायूचे प्रमाण वाढू लागले. ही प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया आपल्याला जगण्यास आवश्यक असणारा प्राणवायू तर सोडतेच पण त्याचबरोबर अन्नाच्या रूपाने स्थिर ऊर्जेचा अंतिम स्रोत म्हणूनही काम करते. ह्या दोन्ही गोष्टी मानवाच्या अस्तित्वासाठी अपरिहार्य आहेत.
४. पहिल्यांदा पृथ्वीवर अस्तित्वात आल्यापासून सजीवसृष्टीची रचना आणि स्वरूप बदलत आले आहे, ह्या घडीला सुद्धा बदलते आहे. आधुनिक जीवशास्त्र, जीव रसायनशास्त्र, पुराजीवशास्त्र अशा विज्ञानाच्या विविध शाखा ह्या बदलांची अचूकतेने नोंद घेत आहेत व पुष्टीकरण करत आहेत. माणसासकट सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व सजीवांच्या जनुकांतील (DNA) विलक्षण साधर्म्य स्पष्टपणे दाखवून देते की सर्व सजीव हे एकाच पूर्वजाचे वंशज आहेत.”

जगात, मुख्यतः अमेरिकेमध्ये, अशी अनेक निर्मितीवादी (creationist) संकेतस्थळे (वेबसाइट्स) आहेत जी उत्क्रांतीवादाच्या सिद्धांताला अनेक शक्य सिद्धांतांपैकी एक दाखवतात. उत्क्रांतीवादाखेरीज ह्यातल्या इतर कुठल्याच सिद्धांताला वैज्ञानिक जगतात मान्यता नाही. डॉ. सिंग ह्यांच्या विचारांशी सहमत असणारे काही लोक (@rammadhavbjp) अशाच संकेतस्थळांचा वापर स्वतःचा मुद्दा पटवून देण्यासाठी करत आहेत. आपल्या ट्विट द्वारे उत्क्रांतीवादाचा सिद्धांत वैज्ञानिक जगातला मान्य नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न करत आहेत. ह्याच ट्विट्स च्या मालिकेत एका लेखाचा संदर्भ आला आहे ज्याचे शीर्षक दिशाभूल करणारे आहे. ‘५०० वैज्ञानिकांचे डार्विनच्या सिद्धांतावर प्रश्नचिन्ह’ असे शीर्षक असणारा हा लेख खरंतर एका जुन्या घटनेविषयीचा आहे. ह्या वैज्ञानिकांनी स्वाक्षरी केलेल्या विधानात असे म्हणले होते की random mutation (अनियत जनुकीय बदल) आणि natural selection (नैसर्गिक निवड) हे जीवसृष्टीतील गुंतागुंतीच्या प्रक्रियांना जबाबदार असल्याच्या दाव्याबाबत आम्ही साशंक आहोत आणि डार्विनच्या सिद्धांताला पाठिंबा देणारे पुरावे पडताळून पाहण्यात यावे. ह्या विधानावर अनेक वैज्ञानिकांनी टीकादेखील केली. हा वाद मुळात उत्क्रांतीमध्ये random mutation आणि natural selection ह्यांची तौलनिक भूमिका काय, असा आहे. पण अनेक संकेतस्थळे विषयातील तांत्रिक वादविवादांना डार्विनच्या सिद्धांताच्याच विरोधी रंगात रंगवत आहेत. ह्या अश्या संकेतस्थळांमुळे एखाद्याची दिशाभूल होणे अगदीच शक्य आहे. पण डॉ. सिंग ह्यांनी उत्क्रांतीवाद फेटाळण्यापूर्वी आणि अभ्यासक्रमात त्यानुसार बदलांची सूचना करण्यापूर्वी MHRD किंवा DST अंतर्गत असलेल्या संस्थेतील एखाद्या वैज्ञानिकाशी चर्चा करायला नको होती का? समाधानाची गोष्ट ही की इंडियन अकॅडेमि ऑफ सायन्सेस (बेंगळुरू), द इंडियन नॅशनल सायन्स अकॅडेमि (नवी दिल्ली), आणि द नॅशनल अकॅडेमि ऑफ सायन्सेस, इंडिया (अलाहाबाद) ह्यांनी प्रसिद्ध केलेल्या संयुक्त विधानात असे म्हटले आहे की “भारतातील तीनही विज्ञान अकादमी हे सांगू इच्छितात की मंत्र्यांनी केलेल्या विधानाला कुठलाही शास्त्रीय आधार नाही. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत, जो मांडण्यात डार्विनचा सिंहाचा वाटा आहे, हा पूर्णपणे प्रस्थापित आहे. उत्क्रांतीच्या मूलभूत संकल्पनांविषयी कोणतेही मतभेद नाहीत.” (येथे, येथे). अनेक वैज्ञानिक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन माननीय मंत्र्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे अशी विनंती करणार्‍या याचिकेवर स्वाक्षर्या केल्या आहेत.

उत्क्रांतीवाद अभ्यासक्रमातून वगळण्याचे व्यावहारिक परिणामदेखील आहेत. उदाहरणार्थ, आपण जर डार्विनच्या सिद्धांताकडे कानाडोळा केला तर आपल्याला multidrug resistant (अनेक प्रतिजैविकांना प्रतिकार करणारे) जीवाणू या सारख्या गंभीर समस्येबाबत अभ्यास व संशोधन करणे मुशकील होईल.

 

डॉ. सिंग ह्यांच्या विधानासंबंधित सर्वात दुदैवी गोष्ट ही की ते स्वतः शास्त्र प्रशिक्षित आहेत (रसायनशास्त्रामध्ये एम.एस्सी. आणि एम. फिल.) आणि देशातील उचचशिक्षणाला जबाबदार असणाऱ्या खात्याचे राज्यमंत्री आहेत. ह्या अधिकारात असलेल्या व्यक्तीची मते ही शिक्षण आणि संशोधनाशी संबंधित निर्णयांवर मोठा परिणाम करू शकतात. माननीय मंत्र्यांनी जीवशास्त्रातील एक प्रस्थापित सिद्धांत शास्त्रीयदृष्ट्या चुकीचा ठरवणे आणि अभ्रासक्रमातील त्याचे वर्तमान स्वरूप बदलण्याची सूचना करणे हे दुर्दैवी आहे. आणि त्यांची चूक मान्य करण्याला असलेला त्यांचा विरोध हे त्याहूनही अधिक विदारक. आज ही वेळ उत्क्रांतीवादावर आलेय, उद्या quantum physics (भाग भौतिकशास्त्र) आणि molecular genetics (आण्विक अनुवंशिकताशास्त्र) वर येऊ शकते, कारण आपल्या पूर्वजांनी ह्याविषयीही काही लिहिलं किंवा सांगितलं असण्याची काही शक्यता नाही!

 

अमिताभ जोशी हे जवाहरलाल नेहरू सेन्टर फॉर ऍडवान्सड सायंटिफिक रिसर्च, बेंगळुरू येथे प्राध्यापक आहेत. त्याचबरोबर इंडियन अकॅडेमि ऑफ सायन्सेस (बेंगळुरू), द इंडियन नॅशनल ससान्स अकॅडेमि (नवी दिल्ली), आणि द नॅशनल अकॅडेमि ऑफ सायन्सेस, इंडिया (अलाहाबाद) चे सदस्य आहेत. ते जे. सी. बोस नॅशनल फेलो असून प्रतिष्ठित शांती स्वरूप भटनागर (जीवशास्त्र: २००९) आणि लक्ष्मीपत सिंघानिया नॅशनल लीडरशिप (यंग लीडर, सायन्स अँड टेकनॉलॉजि:२०१०) पुरस्कारांचे विजेते आहेत. गेली ३० वर्षे त्यांचा उत्क्रांतिवादविषयक संशोधनात आणि शिक्षणात सहभाग आहे.

 

श्रद्धा कर्वे हिने IISER, पुणे येथून जीवशास्त्रात डॉक्टरेट पदवी संपादन केली असून ती आता झुरिच विद्यापीठात  पदव्युत्तर संशोधन करते.

 

अस्वीकृती : मूळ इंग्रजी लेख आणि त्याचे मराठी भाषांतर ह्यात तफावत आढळल्यास इंग्रजी लेखातील मसुदा ग्राह्य मानावा.

मूळ इंग्रजी लेख

Add comment

Login

E-mail is already registered on the site. Please use the Login enter another or

You entered an incorrect username or password

Sorry, you must be logged in to post a comment.