तुमच्यातील बऱ्याच लोकांना “इयत्ता तिसरी शिकलेला क्रांतिकारी संशोधक” – असे शीर्षक वाचून आश्चर्य वाटणे स्वाभाविक आहे . खरे पाहता संशोधन कार्यासाठी असावी लागेते ती इछा शक्ती , जिज्ञासू वृत्ती आणि काहीतरी नवीन शिकण्याची मनोवृत्ती. याच्याच बळावर नांदेड येथील , इयत्ता तिसरी शिकलेल्या श्री दादाजी खोब्रागडे यांनी तब्ब्ल ९ तांदळाच्या जातींचा शोध लावला. त्यांचे रविवारी , दिनांक ३ जून २०१८ रोजी निधन झाले.
चंद्रपूर जिल्ह्यात भाताची लागवड करण्यासाठी तसे अनुकूल हवामान नाही परंतु अशा ठिकाणी दादाजी खोब्रागडे ह्या अत्यंत गरीब आणि जिज्ञासू शेतकऱ्याने त्यांच्या लहान जमिनीच्या तुकड्यात संशोधन करून काही वर्षात तब्ब्ल एक नाही तर ९ तांदळाच्या जाती विकसित केल्या . दादाजी खोब्रागडे यांना शिकण्याची अतोनात इछा होती परुंतु घरातील प्रतिकूल परिस्थिमुळे त्यांना इयत्ता तिसरी पर्यंतच शिकता आले . अगदी लहानपणासूनच दादाजी त्यांच्या वडिलांसोबत शेतीविषयक ज्ञान मिळवू लागले. सन १९८३ मध्ये शेतात काम करत असताना दादाजी खोब्रागडे यांना काही वेगळ्या प्रकारच्या भाताची लोम्बी निरीक्षणास आल्या , दादाजींनी त्या लोम्बी योग्य प्रकारे वाढवल्या आणि त्यांचे काही कालावधीसाठी निरीक्षण केले. त्यांच्या असे निदर्शनास आले कि ह्या वेगळया भाताच्या लोम्बीची लागवड केल्यास भाताचे खूप चांगले उत्पादन मिळू शकते , म्हणून दादाजींनी ह्या नवीन भाताची लागवड केली ज्यातून त्यांना ४ एकरामधून तब्बल ९० पोती एवढे उत्पादन मिळाले. सन १९८९ मध्ये दादाजींनी हे नवीन धान्य कृषी उत्पन्न बाजार समितीत विकायला नेले, परुंतु धानाला कोणतेच नाव नसल्याने , दादाजींना धान्याची विक्री करताना थोड्या अडचणी आल्या . त्याकाळी HMT कंपनीची घड्याळे खूप प्रसिद्धी होती म्हणून या सर्वोत्तम आणि सुवासिक भाताच्या जातीला HMT हे नाव देण्यात आले . मोठ्या मनाच्या असणाऱ्या दादाजींनी ह्या भाताच्या धानाचे बीज गावातील इतर शेतकऱ्यांना देऊ केले ज्यातून त्या शेतकऱ्यांचा आर्थिक फायदा झाला आणि दादाजींच गाव HMT तांदळाच्या धानासाठी प्रसिद्द झाले.
दादाजी खोब्रागडे एवढ्यावरच थांबले नाहीत , त्यांनी त्यांच्या जिज्ञासूवृत्तीला नेहमीच खात पाणी घातले. दादाजी खोब्रागडेह्यांनी त्यांची ४ एकराची शेतजमीन हीच प्रयोगशाळा समजून , कोणत्याही फॅन्सी तंत्रज्ञाचा वापर न करता ,आपले शेतीतील प्रयोग चालूच ठेवले , पुढील दहा वर्षाच्या काळात दादाजींनी आणखी ९ धान्याच्या जाती विकसती केल्या , दादाजींनी त्या धान्याला त्यांच्या नातवंडांची आणि त्यांचा गावाची नावे दिली – एचएमटी, विजय नांदेड, नांदेड ९२, नांदेड हिरा, डीआरके, नांदेड चेन्नूर, नांदेड दीपक, काटे एचएमटी आणि डीआरके -२ , ह्या नऊ तांदळाच्या वाणाच्या जाती दादाजी खोब्रागडे यांनी विकसित केल्या.
आज विविध राज्यांतील शेकतकऱ्यांना याच नवीन तांदळाच्या जातीचे उत्पादन घेऊन खूप चांगला आर्थिक मोबदला मिळत आहे. ह्या शेतकऱ्यांसाठी भात शेतीचे उत्पादन तर वाढलेच आणि लोकांची पसंतीहि ह्या नवीन धानांना मिळत गेली. परुंतु इयत्ता तिसरी शिकलेल्या दादाजींना त्यांनी विकसित केलेल्या ह्या नवीन भाताच्या जातींचे पेटंट कसे रजिस्टर करायचे ह्याचे ज्ञान नव्हते, त्यांच्या ह्या अज्ञानाचा अनेकांनी गैरफायदा घेतला , परिणामी दादाजी खोब्रागडे ह्यांना त्यांच्या संशोधनाचा योग्य तो मोबदला कधीच मिळाला नाही . दादाजी ह्यांना हे संशोधन कार्य पुढे नेताना अनेक आर्थिक अडचणी आल्या तरी देखील त्यांनी न डगमगता त्यांचे संशोधन सुरूच ठेवले. कालांतराने त्यांच्या मुलाच्या आजारासाठी त्यांना त्यांची प्रयोगशाळा असणारी शेत जमीनसुद्धा गहाण ठेवावी लागली . दिवसेंदिवस दादाजींनी परिस्थिती अधिकच बळावली. या सर्व परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी दादाजींना नाइलाजाने त्यांची शेतजमीनरूपी प्रयोगशाळा विकावी लागली.
आता मात्र दादाजींचे संशोधन थांबणार कि काय असे वाटत असतानाच त्यांना त्यांच्या एका नातेवाईकाने दिड एकर शेतजमीन देऊ केली. दादाजींची हि नवीन प्रयोगशाळा नक्कीच त्यांच्या पहिल्या प्रयोगशाळेपेक्षा लहान होती परत्नू प्रबळ इछाशक्ती आणि द्धेयाची कास दादाजींना सतत नवीन काहीतरी शोधण्यासाठी उत्तेजित करत राहिल्या . लोकांकडून त्यांच्या ज्ञानाची आणि संशोधनाची सतत उपेक्षाच होत गेली परुंतु बिकट आर्थिक परिस्थितीमध्ये दादाजींनी कोणत्याही मान सन्मानाची अपेक्षा केली नाही .
छोट्याशा गावातून त्यांचे संशोधन अविरतपणे करणाऱ्या दादाजींना सन २००५ मध्ये ‘नॅशनल इनोव्हेशन फाऊंडेशन’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला . तसेच तेंव्हाचे राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते देखील राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला . त्यानंतर मात्र दादाजींचं नाव संपूर्ण देशपातळीवर झालं. सन २००६ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे दादाजी खोब्रागडे यांना “कृषिभूषण” पुरस्काराने गौरवण्यात आलं. दादाजींना पुरस्कार म्हणून फक्त रोख २५ हजार रुपये आणि सोन्याचे पदक देऊन सत्कार करण्यात आला. कालांतराने दादाजींना पैशाची चणचण भासु लागली , त्यांची आर्थिक परिस्थिती अधिक बिकट झाली , म्हणून त्यांनी त्यांना मिळालेलं सुवर्णपदक विकण्याचा विचार केला , परुंतु तेथेही त्यांच्या संशोधनाची उपेक्षाच झाली, दादाजींना त्यांना मिळालेले सुपर्णपदक हे संपूर्णतः सोन्याचे नसल्याचे कळाल्यावर धक्का बसला. ज्याची पुढे मीडिया आणि लोकप्रतिनिधींद्वारे दखल घेण्यात आली आणि दादाजींना योग्य न्याय देण्यात आला.
सन २०१० मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सुप्रसिद्ध असणाऱ्या “फोर्ब्स” मासिकाने जगातील सर्वोत्तम ग्रामीण उद्योजकांच्या यादीत दादाजींच्या कार्याचा गौरव केला . तेंव्हा आपल्या येथील प्रशासनाला जाग आली आणि मग काय दादाजींना ह्या ना त्या कारणाने सत्कार , समारंभ , सोहळे करण्यात सर्व यंत्रणा अगदी गुंगून गेल्या . पण त्याचा उपयोग फारसा काही झाला नाही. दादाजींना जरी शंभरहुन अधिक पुरस्कार मिळाले , असंख्य शाली, पुष्पगुच्छे आणि भेटी मिळाल्या तरीदेखील त्यांचे संशोधन नावारूपाला येण्यासाठी आणि पुढे त्यामध्ये आणखी प्रगती करण्यासाठी म्हणावी तशी आर्थिक मदत मिळाली नाही. अगदी त्यांच्या आयुष्यच्या शेवटच्या टप्पात देखील दारिद्र आणि विवंचना ह्यात घालवत , त्यांचा मृत्यू झाला.
आज संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरामधून अनेक संशोधक नावारूपाला येतात . परंतु आजही अनेक संशोधकांना त्यांच्या संशोधनाचा म्हणावा असा आर्थिक मोबदला आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळत नाही. आपल्या देशात अनेक प्रयोगशील शेकतरी आहेत परुंतु केवळ त्यांच्या अज्ञानभावी त्यांनी विकसित केलेल्या नवीन धान्याला म्हणावी तशी ओळख मिळत नाही आणि त्यांचे हे ज्ञान फक्त त्यांच्या पुरतेच मर्यादित राहू शकते. आज त्यांच्या ह्या अनुभवी ज्ञानाचा विकास करून जतन करणेदेखील तितकेच महत्वाचे आहे. दादाजी खोब्रागडे यांसारख्या अनेक अशिक्षित संशोधक आणि चिकित्सक वृत्ती अंगी बाळगणाऱ्या आणि आपल्या संशोधांमार्फत खऱ्याअर्थाने समाजविकासाठी धडपड करणाऱ्या व्यक्तीना सर्वस्थरातून मदत मिळाली तर अनेक नवीन संशोधनानां चालना मिळू शकते.
भारताला खऱ्या अर्थाने एक विकसित देश म्हणून नावारूपाला आणण्यासाठी अगदी तळागाळातील व्यक्तींपर्यंत संशोधनाबद्दल आवड निर्माण होणे हे महत्वाचे आहे . तसेच सामाजिक दृष्टीकोन बदलून खेडोपाडी, छोट्यामोठ्या शहरात दादाजी खोब्रागडे सारख्या अनेक संशोधक आणि चिकित्सक वृत्ती असणाऱ्या व्यक्तींचा आणि त्यांच्या ज्ञानाचा गौरव करून आणि योग्य तो मोबदला देऊन त्यांना न्याय मिळवून देणे देखील तेवढेच महत्वाचे आहे.
गायत्री क्षीरसागर हिने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे येथून “विषाणूशास्त्र” या विषयात पदवी शिक्षण घेतले आणि सध्या ती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (आयआयएसईआर), पुणे येथील एक्सायटिंग सायन्स ग्रुप , सायन्स आऊटरीचसाठी, असोसिएट म्हणून काम करत आहे.